आपण

कधी वरती,कधी खाली, तरी तिथल्या तिथे आपण
 जणू की ट्रेन स्टेशनचे सरकणारे जिने आपण

 कशाला उंच माणुस बघत बसतो,झाक तू डोळे
 तुला कळणार नाही मग,किती आहो खुजे आपण

 कशाला खुमखुमी येते कुणाला युद्ध करण्याची
 अमुक मेले,तमुक जखमी असे मग आकडे आपण

 तुझ्या शब्दात सा-या जाळ कोठुन आणशी इतका
 खरेतर फार पूर्वी विझुन गेलेले दिवे आपण

 सरळ आहोत,साधे सरळ आहे वागणे सगळे
 जिथे जातो तिथे होतो कसे पण आडवे आपण 

 तसाही ताल नाही चुकत थोडाही तुझा माझा 
समेवरती तरी का येत नाही छानसे आपण 

 कुठे गुंतून नाही जायचे हे ठरवले होते
 तरी गुंते किती करतोच आहो सारखे आपण

 शहाण्यांच्या मताला ‘जाऊ दे खड्ड्यात’ म्हणतो…पण
 खुळ्यांनाही कशाने वाटतो भलते खुळे आपण

 रवी घेऊन घुसळे काळ,सारे दिवस अन रात्री
 जणू चोथाच जगणे अन क्षणिकसे बुडबुडे आपण

 नको निष्कर्ष काढू सारखा प्रत्येक गोष्टीचा 
इसापाच्या कथेचे सिंह,कोल्हे,ना ससे आपण 

डॅा.प्रमोद बेजकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Reकामा

खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही