खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही

खूप काही राहिलेले,खूप काही भोगलेही
 खूप अजुनी दंश ओले चंदनाच्या शुभ्र देही

 खूप काही बोलताना खूप उरले मौन ओठी
 गंधलेल्या त्या क्षणांची पाकळी उरली न देठी

 खूप काही तू दिलेले घेतले नाही तरी मी 
 खूप जागी उसवलेली एक झोळी भरजरी मी

 खूप वेळा तोल जावा,सावरावे पण कशाला 
 मोकळे झाल्याविणा का स्पर्श होतो चांदण्याला

 खूप काही रुजत जावो,मी जरी खडकाळलेलो
 मी दुभंगावे असे की मी जणू मातीस स्फुरलो 

 खूप काही खुपत राही,त्या कदाचित स्वप्नकाचा
 पाय अडवी सारखा तो उंबरा असतो मनाचा

 खूप आहे मी मनस्वी,खूप देहस्वी जशी तू 
 भान विसरुन शरण जातो,रोज घे माझा बळी तू 

 खूप आहे खूप नाही,कर वजाबाकी हवी तर
 पान कोरे शेवटाला,तू हवे ते मांड उत्तर

 प्रमोद बेजकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Reकामा

आपण