नवीन वर्षाच्या (फुकटच्या) शुभेच्छा (वेळ असेल तर वाचा,नाहीतर नुस्तंच👍 करा😃
नवीन वर्षाची सकाळ उजाडली. दरवर्षीप्रमाणे,चार दिवसातच गारठून जाणारा, मॉर्निंग वॉकला जायचा संकल्प मी आदल्या रात्रीच सोडला होता.हा सोडण्यासाठीच सोडलेला मूर्खासारखा संकल्प मला उबदार दुलईत मस्तपैकी झोपूही देईना.त्यामुळे डोळ्यात झोप मावत नव्हती तरी मी नवजात संकल्पाचा मान राखण्यासाठी,धडपडत घराबाहेर पडलो,तर समोरून नन्या.माधुरी दिक्षितमुळे फ़ेमस झालेल्या नेने या नावाचं नेन्या आणि नंतर जिभेच्या निव्वळ आळसामुळे आम्ही मित्रांनी नन्या केलेला आता डोक्यावर बाल नसलेला बालमित्र.
नन्याचं ध्यान नेहमीसारखंच दिसत होतं.म्हणजे त्याच्या बावळटपणात भर घालणारी त्याची ती कानटोपी,शांताबाई शेळक्यांना,’ही चाल तुरूतुरू’ ही ओळ नन्याला बघून सुचली असावी असं वाटायला लावणारी त्याची तुरूतुरू चाल,आणि वा-यावर फ़डकत राहणारा त्याचा तो लेंगा.लेंगा घालून मॉर्निंग वॉक करणारा म्हणून नन्या प्रसिद्धच आहे.पण त्यालाही त्याचा तसा नाईलाजच.लहानपणी पुस्तकात वाचलेलं,’लेंगे स्वराज्य लेंगे’ ही घोषणा आणि प्रभात फ़ेरी यांचं समीकरण जे बालनन्याच्या डोक्यात बसलं,ते मोठा झाल्यावर गणितातलं बाकी सारं विसरलं तरी तसंच कायम आहे.
तर अशा या नन्याने मला बघताच चाल अधिकच तुरूतुरू केली आणि जवळ येऊन माझा हात हातात घेऊन इतक्या जोरात हलवायला सुरवात केली की नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी खांदा निखळून हॉस्पीटलात भरती होतोय की काय अशी मला भिती वाटायला लागली.’नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ नन्या इतक्या जोरात ओरडला की आजूबाजूच्या चार लोकांना या भूतलावर नविन वर्ष आणणारा भगीरथाचा चुलत भाऊ मीच असल्याचा संशय यावा.
इतर वेळी नन्या म्हणजे हातात काठी आणि कपाळावर आठी असा माणूस.,याने चेह-याला पावडर ऐवजी चुकून गूळ लावला की काय असा संशय यावा इतका माशीही उडणार नाही आणि मख्ख हेच विशेषण फ़िट्ट बसावं असा त्याचा चेहरा.माणूस हा हसणारा प्राणी ही व्याख्या चूक ठरवण्यासाठीच याचा जन्म झाला असावा.पण बहुदा नवीन वर्षी हसण्याचा त्याने संकल्प सोडला असावा.कारण ’अहो आश्यर्यम’म्हणावंसं वाटावं असं लांबरुंद हसू नन्याच्या चेह-यावर झळकत होतं
’आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे आनंदाचे क्षण तुला लाभोत,तुझ्या प्रसिद्धीचा घमघमाट सा-या विश्वात पसरो,तुझं आरोग्य बघून बलभीमही आश्चर्य चकीत होवो’, अशा आचरट पद्धतीने त्याने जणू मला शुभेच्छांचं मानपत्रच द्यायला सुरवात केली,तेव्हा मी त्याच्याकडे टकामका बघायलाच लागलो.कारण नन्या हा एकूण कंजूष म्हणून प्रसिद्ध.कधी हॉटेलात एकत्र गेलो तर आपल्या स्पर्शाने आपल्या खिशाचं पावित्र्य बिघडणार नाही याची तो काळजी घेणार.कुणाचं कौतुक करायचं तरी ठीक,बरं या शब्दांच्या पलीकडे याची झेपच जाणार नाही.स्वत:चं काहीही सहजासहजी न सोडण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच त्याला बद्धकोष्ठ आहे असं आम्ही त्याला चिडवायचो,तेव्हा एवढ्या शब्दांचा याला डायरिया कसा झाला याचाच मला अचंबा वाटायला लागला.
’काय रे तुझी तब्येत बरी आहे ना?संपूर्व वर्षाली पुरतील इतक्या शुभेच्छा सकाळी सकाळीच संपवल्यास म्हणून विचारतो’असं मी म्हणताच,नन्या गंभीर होऊन म्हणाल,’कालपर्यंत तब्येत बरी नव्हती.पण काल गंपूमहाराजांच्या प्रवचनाला गेलो तेव्हा डोळे उघडले’.
’कुठले ड्रॉप्स घातले तुझ्या गंपूमहाराजांनी’मी खवचटपणे विचारलं.इतरवेळेला अशा चावटपणावर ज्वालामुखीसारखा उसळणारा नन्या,आईस कॅंडीच्या थंडपणाने म्हणाला,’डोळ्यात अंजन घातलं महाराजांनी अंजन.महाराज म्हणाले,अरे,तुम्ही आनंद वाटा.आनंद सर्वत्र पसरलाय.मुक्तपणे तो वाटा. जे वाटाल ते शंभरपटीने परत मिळेल’.
’अच्छा,म्हणजे आज नव्या वर्षी तू आनंद वाटायला घेतलाहेस,आणि मीच तुझं पहिलं गि-हाईक झालोय’ मी जमेल तितका छद्मी आवाज काढत म्हणालो.’असं काही नाही. सकाळी दूधवाला भय्या आला,त्याला मी पातळ दूधाबद्दल नेहमीसारखं न झापता म्हंटलं,इतना घट्ट दूध पचता नही रे,नेहमीप्रमाणे पानी डालो’.तो एकदम खूष झाला माझं बोलणं ऐकून.तुला माहितीये ना मन्याचं आणि माझं भांडण झालंय ते,तर मगाशी आम्ही समोरासमोर आल्यावर मी म्हंटलं’गुड मॉर्निंग मन्या,तर तो आश्चर्याने दिग्मूढ की काय म्हणतात तसा झाला.आणि आता तू.तुझं नेहमीसारखं रडकं तोंड बघितलं तेव्हाच वाटलं तुझ्या मुखीपण आनंदाचे दोन थेंब टाकावेत’ पल्स पोलीओची जाहिरात करणा-या अमिता्भसारख्या मायाळू आवाजात नन्या म्हणाला.
आनंद द्यायचं हे नन्याचं व्रत नवीन वर्षात किती दिवसात संपेल कुणास ठाऊक,असा विचार करून आणि गडी तापलाच आहे तर वाकतो का बघू या,असा विचार करून मी त्याला म्हंटलं,’नन्या,मी तुला कित्येक दिवसापूर्वी दिलेले आणि तू सोईस्कररीत्या विसरलेले दोन हजार रूपये तू जर मला परत केलेस तर मला आज झाला त्यापेक्षा किती तरी जास्त आनंद होईल.केव्हा येऊ पैसे घ्यायला?’
तर नन्या म्हणाला,’नाही ते शक्य नाही.तू असा अविचार करू नकोस. गंपू महाराजांनी सांगितलंय,पैशाने आनंद मिळत नाही.पैसे देऊन आनंद विकत घेऊ नका.तसा आनंद फ़क्त माझ्या दुकानात सॉरी आश्रमात मिळेल’.
एकूण नन्याच्या शुभेच्छा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे हे माझ्या लक्षात आलं.तरीही फ़ुकटात हा चांगुलपणा घ्यायची आयडिया काही वाईट नाही असा विचार करून मी त्याला म्हंटलं,’नन्या,या वर्षी तुला म्हाडाची लॉटरी लागो. ईडीला छापा घालायचा उबळ यावी इतका पैसा तुझ्याकडे येवो.’
माझ्या शुभेच्छांच्या सरबत्तीने आणि इतक्या कमी वेळात गुरूची विद्या गुरूला देणारा शिषोत्तम नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळाल्याने,नन्या सर्द का काय म्हणतात तसा होऊन माझ्याकडे बघतच राहिला.
डॉ.प्रमोद बेजकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
pramodbejkar@gmail.com