एक गाणं
करतो वजा सा-यातुनी थोडी तरी उरतेस तू
वाळूतल्या सा-या खुणा,वाहून गेल्या सागरी
मागे न काही राहिले, बघतोच वळुनी मी तरी
कोजागिरीचा चंद्रही, येऊन मालवतेस तू.....
हातातला तू कवडसा,निसटून गेलेला पुन्हा
तू मृगजळाचा वायदा,माझ्या तहानेला पुन्हा
असतेस तू नसतेस तू,
गुंता असा करतेस तू...
भलताच नाही हट्ट हा,भलतेच नाही मागणे
रात्रीस एकांती कधी तू माळ माझे चांदणे
आहे शहाणा मी तरी,वेडा खुळा म्हणतेस तू...
श्वासात तू,गात्रात तू, अस्तित्व हे झाले तुझे
आक्रोश हा पेशीतुनी, तू पाहिजे तू पाहिजे
ह्रदयातही ठोका तुझा, डोळ्यातुनी झरतेस तू...
करतो वजा सा -यातुनी थोडी तरी उरतेस तू
प्रमोद बेजकर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
pramodbejkar@gmail.com